राज्यात महापालिका निवडणुकांमुळे (Election) निवडणूक परिक्षेत्रात आचारसंहिता सुरू असल्याने भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. मुंबईसह महानगरात ही भरारी पथके संशियत वाहनांची तपासणी करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक उमेदवार बिनविरोध झाल्याने आरोप पैशांचा वापर करुन, आमिष दाखवूनच हे उमेदवा बिनविरोध केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच, निवडणूक काळात अवैधपणे पैशांची देवाण-घेवाण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाचे कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. त्यातच, मुंबईतील (Mumbai) देवनार परिसरात भरारी पथकाने तब्बल 2 कोटी 33 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या देवनार परिसरात निवडणूक भरारी पथकाकडून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. ही रोकड ATM मध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पैशांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून त्याबाबतचा तपास आयकर विभाग करत आहे. सध्या ही रोकड देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आली असून ही रोकड कुठून कुठे नेली जात होती, याबाबत सविस्तर चौकशी केली जात आहे. दरम्यान, देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशनडायरीत केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयकर विभाग या पैशांचा माग काढत आहे.




