मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली आहे. काल रात्री मातोश्रीवर निवडक उमेदवारांना बोलावून त्यांना एबी फॉर्म देण्यात आले. ही प्रक्रिया पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू होती, तर आज सकाळीही काही उमेदवारांना फॉर्म देण्यात येणार आहेत.
मात्र या फॉर्म वाटपादरम्यान ठाकरे गटातील दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद उफाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वांद्रे परिसरातील एका उमेदवारीवरून अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यात तीव्र मतभेद झाले. या वादानंतर अनिल परब यांनी तडक मातोश्री सोडल्याची माहिती समोर येत आहे.
वॉर्ड क्रमांक ९५ मधून हरी शास्त्री यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हरी शास्त्री हे श्रीकांत सरमळकर यांचे जावई असून सरमळकर हे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. या उमेदवारीला अनिल परब यांचा विरोध होता, तर वरुण सरदेसाई यांनी शास्त्री यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे समजते. याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद वाढल्याची चर्चा आहे.
वरुण सरदेसाई हे वांद्रे येथून आमदार असून ते आदित्य ठाकरे यांचे नात्याने बंधू लागतात. अनिल परब हेही विधान परिषदेचे आमदार असून ते ठाकरे कुटुंबातील विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात. मातोश्रीच्या अगदी जवळच्या वर्तुळातील या दोन नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने पक्षांतर्गत अस्वस्थतेची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवत आहेत. गेल्या आठवड्यात दोन्ही पक्षांनी युतीची अधिकृत घोषणा केली होती. मात्र ज्या वॉर्डांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या ठिकाणी अद्याप एबी फॉर्मचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही जागांवरचा तिढा अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.




