न्यायालयाचा निर्देश – “सहकार्य करा, एक महिन्यात खटला निकाली; पुढील हजेरीची गरज नाही”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 2008 मधील जुन्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांच्या कोर्टात सोमवारी (11 डिसेंबर) हजर झाले. रेल्वे भरती परीक्षेदरम्यान मारहाण आणि उत्तेजक भाषण केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या या खटल्यात, न्यायालयाने राज ठाकरे यांना सरळ विचारलं – “गुन्हा कबूल आहे का?” यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट आणि ठाम उत्तर दिले – “मला गुन्हा कबूल नाही.”
राज यांची ही भूमिका समोर आल्यानंतर न्यायालयाने खटला लवकर संपवण्याचा मनोदय व्यक्त केला. न्यायाधीश कुलकर्णी म्हणाले, “तुम्ही सहकार्य केलं, तर एक महिन्यात प्रकरणाचा निकाल लागेल. तुम्हाला पुढील तारखांना उपस्थित राहण्याचीही गरज नाही.”
या खटल्यासोबतच इतर सात सह-आरोपी देखील कोर्टात उपस्थित होते. मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव यांनीही हजेरी लावली. राज ठाकरे यांची बाजू ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी मांडली.
2008 मध्ये रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती. उत्तर भारतीय परीक्षार्थ्यांची मोठी संख्या आणि मराठी युवकांच्या नोकरीच्या संधींबाबत मनसेने तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कल्याण हद्दीत मारहाण आणि भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. सुरुवातीला खटला कल्याण कोर्टात होता, मात्र आता तो ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला आहे.
न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतर आता या 17 वर्षांपासून चालत आलेल्या खटल्याचा निकाल एका महिन्यात किंवा जूनपर्यंत लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि मनसेसाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.




