बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bacchan) पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. नेहमीच तिखट भाष्य करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापाराझींच्या कपड्यांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वाद उभा राहिला. त्यांच्या वक्तव्यावर नेटिझन्सनी जोरदार टीका करत त्यांना प्रचंड ट्रोल केले.
एका कार्यक्रमादरम्यान जया बच्चन यांना पापाराझींशी असलेल्या नात्याबद्दल विचारलं असता त्यांनी माध्यमांचा आदर असल्याचं सांगितलं, पण बाहेर उभ्या असणाऱ्या काही पापाराझींच्या “घाणेरड्या पँट” आणि “लो-ग्रेड मोबाईल”वरून त्यांनी सवाल उपस्थित केला. या लोकांचा बॅकग्राऊंड आणि शिक्षण काय, असा थेट प्रश्नही त्यांनी विचारला. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर संतापाची लाट उसळली.
या वादात आता बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनीही अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले, “इथं सगळे छान दिसतात… चांगली पँट, चांगला शर्ट घालतात.” त्यांनी जया बच्चन यांचं नाव न घेताही कोणाकडे बोट आहे, हे सगळ्यांना लगेच समजलं. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
जया बच्चन यांचं पापाराझींवर भडकणं हे नवीन नाही. याआधीही त्यांनी अनेकदा अशाच प्रकारची नाराजी व्यक्त केली असून प्रत्येक वेळी त्यांचा हा विषय चर्चेत आला आहे. काहीजण त्यांची बाजू घेतात, तर काही त्यांच्यावर टीका करतात. पण त्यांच्याभोवतीचा वाद मात्र कधीच कमी होताना दिसत नाही.




