spot_img

Sayaji Shinde : कुंभमेळ्याला अडथळे येऊ नयेत म्हणून… सयाजी शिंदेंचा फडणवीसांना टोला

spot_img

“विकास होऊ द्या, पण झाडांच्या मोबदल्यात निसर्गाची हत्या नको” नाशिककरांचा आवाज बुलंद

नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीत तपोवन परिसरातील मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या निर्णयाला जोरदार विरोध करत अभिनेते सयाजी शिंदे थेट मैदानात उतरले असून त्यांनी प्रशासनावर कडक टीका केली आहे.

शिंदे म्हणाले, “निवडून दिलं म्हणून सगळे अधिकार तुमच्याकडेच आहेत असं समजू नका. जिथे झाडं तोडली जातील, तिथे आम्ही ठाम उभे राहू. मोठी झाडं तोडून त्याऐवजी रोपे लावण्याची ही पळवाट चुकीची आहे.” त्यांचं उदाहरणही लक्षवेधी ठरलं – “एखाद्याला मारून त्याच्या बदल्यात मूल दिलं तर चालेल का?” ते पुढे म्हणाले की राजकारणाचा अभ्यास नसला तरी पर्यावरणाचा प्रश्न राजकीय वादात खेचू नये. अजित पवारांसह काही भाजप नेत्यांनीही या मुद्द्यावर पाठिंबा दिल्याचं त्यांनी नमूद केलं.

सयाजी शिंदेंच्या “साधू आले-गेले काही होत नाही, झाडं गेली तर खरा फरक पडतो” या वक्तव्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र शिंदेंनी त्यावर शांत प्रतिक्रिया देत, “आपण आपल्या जागी बरे, बाकींचं ते पाहू दे” असं म्हणत वादात पडणं टाळलं.

या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदेंच्या भूमिकेला खुलेपणाने समर्थन दिलं. त्यांनी ट्विट करत सांगितलं की, “विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं आजची गरज आहे. तपोवनातील प्रश्नावर समोपचाराने तोडगा निघायलाच हवा.”

त्याउलट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष टोलाही दिला. ते म्हणाले, “काहीजण राजकीय कारणाने अचानक पर्यावरणप्रेमी झाले आहेत. कुंभमेळ्याला अडथळे येऊ नयेत म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करू.”

दरम्यान, कलाकारांमध्येही या प्रश्नावर मोठी चळवळ उठली आहे. नाट्य, चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी नाशिकमध्ये भव्य निषेध आंदोलन केलं. अभिनेत्री अनिता दाते म्हणाल्या, “लहानपणापासून तपोवन पाहतेय, इथली झाडं टिकली पाहिजेत.”
तर अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी “तपोवन वाचवा, तपोवन वाढवा” असा नारा दिला. तपोवनातील वृक्षतोड थांबवावी, विकासाचा मार्ग निसर्गाच्या हानीतून नव्हे तर समतोलातून शोधावा, अशी सर्वसामान्य नाशिककरांची एकमुखी मागणी आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ