स्टुडिओतील कामगार ते जागतिक दर्जाचे दिग्दर्शक या महान प्रवासाचे अबोल अध्याय आता एका भव्य चित्रपटातून उलगडणार
भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी देणारे, मराठमोळ्या प्रतिभेचा जगभर ठसा उमटवणारे दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे जीवन आता रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्या असामान्य कार्याचा आणि संघर्षमय प्रवासाचा भव्य चित्रपट नुकताच जाहीर झाला आहे.
या चित्रपटात शांताराम यांची भूमिका सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) साकारणार असून त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रचंड गाजतो आहे. डोक्यावर टोपी, हातात कॅमेरा आणि कलाकाराला शोभेल असे जॅकेट—या अंदाजातल्या सिद्धांतच्या लूकचे भरभरून कौतुक होत आहे. ही भूमिका त्याच्या कारकिर्दीलाही नवी उंची देणारी ठरणार असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे. स्वत: सिद्धांत चतुर्वेदी याने ही भूमिका मिळाल्याबद्दल अभिमान व्यक्त करताना सांगितले की, “व्ही. शांतारामसारख्या दिग्गजाची भूमिका साकारणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि सन्मान आहे. त्यांच्या चिकाटीने आणि धैर्याने मला खूप प्रेरणा दिली आहे.”
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे करत असून ते म्हणतात की शांताराम यांच्या धाडसी प्रयोगशीलतेतून भारतीय सिनेमा आकारास आला. त्यांच्या कथेतलं तेजस्वित्व प्रेक्षकांसमोर नेणे हेच या चित्रपटामागचं ध्येय आहे. राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर्स प्रोडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित झालेला ‘व्ही. शांताराम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असून पहिल्या पोस्टरमुळेच या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.




