चिपळूण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबू आझमींचा सत्ताधारी भाजपपासून नितेश राण्यांपर्यंत टोकदार वार
कोकणातील राजकारणात समाजवादी पक्षाने औपचारिक प्रवेश करत चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या पार्श्वभूमीवर सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी चिपळूणमध्ये आयोजित सभेत भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
सभेमध्ये बोलताना आझमी म्हणाले की, देशाची फाळणी हा इतिहासातील सर्वात वेदनादायी प्रसंग असून गांधींनी ती रोखली असती तर त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला असता. “इंग्रजांच्या ताटाखालचे मांजर असलेले आज सत्तेत बसलेत,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
सावंतवाडीतील मुस्लिम तरुणाच्या मृत्यूवरूनही त्यांनी सरकारला टार्गेट केले. “तरुणाला छळ करून मारलं जातं, खोटे आरोप लावले जातात आणि त्याचवेळी काही मंत्री मशिदीत घुसण्याची धमकी देतात; पण सरकार मौन धरतं,” असे ते म्हणाले.
मुंबई सिरीयल ब्लास्ट आणि मालेगाव स्फोट प्रकरणांचा संदर्भ देत आझमी यांनी आरोप केला की, “साध्वी प्रज्ञा सिंग यांना वाचवण्यासाठी न्यायप्रक्रियेवर दबाव आणला गेला. साक्षीदारांवरही दडपण टाकण्यात आले. देशात मुस्लिम होणेच गुन्हा ठरवलं जात आहे.”
शेतकरी आत्महत्यांवरून ते अधिकच आक्रमक झाले. “महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मृत्यू सर्वाधिक; अशा परिस्थितीत या सरकारने लाज वाटून पाण्यात बुडून मरावं. शेतकऱ्यांवर कठोर कारवाई आणि उद्योगपतींना कोट्यवधींची कर्जमाफी—हा अन्याय आहे,” असा कटू आरोप त्यांनी केला.
लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही त्यांनी नितेश राण्यांवर हल्ला चढवला. “मुस्लिम मुलीशी हिंदू मुलगा लग्न केलं तर प्रोत्साहन, पण हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी विवाह केल्यास तिच्यावर गुन्हे दाखल केले जातात—हा दांभिकपणा आहे,” असे ते म्हणाले. सभेमध्ये आझमींचे सर्व मुद्दे चिपळूणमधील सपाच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला नवीन उर्जा देणारे ठरले.




