नेत्यांच्या पळवापळवीमुळे शिंदे गट अस्वस्थ; दिल्लीतून संयमाचे ‘फर्मान’, मुंबई महापालिकेआधी मोठे राजकीय वादळ?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसतसा महायुतीतील तणाव उघडपणे दिसू लागला आहे. भाजप आणि शिंदे सेना हे दोन घटक आता वेगवेगळ्या ध्रुवांकडे सरकत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शिंदे गटातील पदाधिकारी आणि प्रमुख चेहरे भाजपकडे वळवण्याचे प्रयत्न वाढले असून, त्यामुळे शिंदे सेनेचे अनेक मजबूत बुरूज धोक्यात आले आहेत.
यामुळे “महायुती वाचवायची की पक्ष?” असा पेच शिंदे गटासमोर उभा राहिला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, जिल्हाध्यक्ष यांच्यापर्यंत पळवापळवी पोहोचल्याने शिंदे गटामध्ये नाराजी उसळली आहे. भाजपने आखलेली ही मोहीम थेट दिल्लीशी संबंधित असल्याच्या चर्चा रंग आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचे समजते. भाजपच्या ‘फोडाफोडी’च्या हालचालींबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र या भेटीनंतरही राज्यात छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री यांसारख्या भागांत शिंदे गटातील नेत्यांचा भाजप प्रवेश सुरूच राहिला.
यामुळे युतीत तणाव वाढू नये म्हणून भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडून राज्यातील नेत्यांना ‘सबुरीचा सल्ला’ देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत संयमित भूमिका ठेवण्याचे फर्मान दिले असल्याचेही बोलले जात आहे.
मुंबई महापालिका दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत मानली जात असल्याने, शिंदे सेनेसहच लढायचे की स्वतंत्र भूमिका घ्यायची, यावर भाजप अंतर्गत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. शिंदे फडणवीस सरकार स्थिर ठेवण्यासाठी कोणताही धोकादायक निर्णय न घेण्याची भूमिका सध्या भाजपने घेतल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान ठाकरे गट शिंदे गटावर सतत टीका करत असून, त्यामुळे शिंदे भाजप युतीत तणावाची छाया आणखी गडद होत आहे. तरीही, “जुळेना पण वाचूनही करमेना” अशी स्थिती दोन्ही पक्षांची झाल्याची राजकीय वर्तुळात कुजबुज आहे.




