बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी काही महिन्यांपूर्वी लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्या वेळी तिच्या कुटुंबाकडून विरोध, लग्नाला भावांची गैरहजेरी यामुळे सोनाक्षी चर्चेत राहिली. त्यातच ती लग्नानंतर सतत पतीसोबत विदेशात दिसत असल्याने तिच्या फिल्मी करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
काही जण तर सोनाक्षी आता चित्रपटांपासून दूर राहणार, विदेशात स्थायिक होणार असा तर्क लावत होते. याचदरम्यान अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांनाही चांगलाच उधाण आलेलं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने या सर्व चर्चांवर थेट उत्तर देत स्पष्ट भूमिका मांडली.
सोनाक्षी म्हणाली, “मी जर प्रेग्नंट झाले, तर सर्वात आधी मीच स्वतः सांगणार की मी प्रेग्नंट आहे. त्यामुळे शांत बसा.” तिने पुढे सांगितले की, लग्नामुळे तिच्या व्यावसायिक आयुष्यात कोणताही बदल झालेला नाही आणि तशी वेळ येऊही देणार नाही. “काम न करण्याचा विचारही मी करू शकत नाही. लग्न आयुष्याचा भाग आहे, पण ते माझ्या करिअरमध्ये अडथळा येऊ देणार नाही.” जहीरसोबत राहण्याबद्दल बोलताना सोनाक्षीने सांगितले की, सासरच्या कुटुंबात एकत्र राहण्याचा निर्णय पूर्णपणे तिचाच आहे. “जहीरने बाहेर राहण्याचा पर्याय दिला होता, पण मीच म्हणाले की तुला जायचं असेल तर जा, मी इथेच राहणार.”
अशा ठाम आणि स्पष्ट भूमिकेमुळे सोनाक्षी सिन्हाने चर्चांना पूर्णविराम दिला असून, ती सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.




