महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये; कोठे परिवाराच्या निर्णयाने सोलापुरात चर्चांना उधाण
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोक्यावर आल्या असून, पक्षांतराची लाट वेग घेत आहे. महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीकडे जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भाजपने पक्षविस्ताराच्या रणनितीला गती देत आता सोलापुरात मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळला आहे.
सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचे सुपुत्र प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या गटात माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा आणि शशिकांत कैंची यांचा समावेश आहे.
मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा प्रभावी राजकीय डाव साधल्याची चर्चा सोलापुरात रंगली आहे.
दरम्यान, प्रथमेश कोठे यांचे वडील दिवंगत महेश कोठे यांनी राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपमध्ये ‘जुने विरुद्ध नवे’ असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, कोठे परिवाराच्या एकत्रित निर्णयाने सोलापुरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
अलीकडच्या काळात सोलापुरात विविध पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर भाजपचा पाया अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.




