spot_img

Indian Cultural Program : सौदी अरेबियातील रियाध येथे पार पडला ‘प्रवासी परिचय 2025’ हा सोहळा

spot_img

भारतीय सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पडला पार

सौदी अरेबियातील (Saudi Arabia) भारतीय दूतावास, रियाध (Riyadh) यांनी 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 दरम्यान ‘ प्रवासी परिचय 2025 ’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय समुदायातर्फे सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणजे विविध राज्यांचे सांस्कृतिक सादरीकरण ‘स्टेट्स डे सेलिब्रेशन’. यामध्ये रियाधस्थित मराठी परिवार रियाध या सौदी अरेबिया स्थित संस्थेने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि इतिहास सादर केला.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सादरीकरणाचे नेतृत्व कम्युनिटी स्टेट कोऑर्डिनेटर अभिषेक आरोळे यांनी केले. त्यांना प्रशांत चौधरी, सुशील गव्हाणे, आनंद हिरेमठ, विशाल मुथुकृष्णन तसेच महिला वर्गातून अमृता चौधरी यांच्या आयोजन टीमने सक्रिय पाठिंबा दिला.

या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे विविध आकर्षक आणि पारंपरिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये गणेश आराधना, पोवाडा, दहीहंडी उत्सव, खंडोबाचा भंडारा यांसारख्या लोककला आणि उत्सवांचा समावेश होता. बाल कलाकारांतर्फे शिवरायांचे मावळे आणि कोंढाणा किल्ला चढाई व सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम सादर करण्यात आला. तसेच महाराष्ट्र समुदायातर्फे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ जसे की पिठलं भाकरी, उकडीचे मोदक, पुरणपोळी आदी प्रदर्शित करण्यात आले होते.ज्याचा आस्वाद आलेल्या पाहुण्यांनी, भारतीय राजदूत आणि दूतावासाच्या इतर कर्मचाऱ्यांनी अगदी मनसोक्त घेतला. महाराष्ट्रीयन समुदायातर्फे पारंपरिक खण कापडाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते ज्याला सर्व पाहुण्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक आरोळे यांनी केले ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य समुदायातर्फे केलेल्या प्रत्येक सादरीकरणाची माहिती प्रेक्षकांना देण्यात आली.

हे सर्व कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध वयोगटातील बालक, महिला आणि पुरुष कलाकारांनी सादर केले. विशेष म्हणजे, सर्व सहभागी कलाकारांनी आपल्या शाळा आणि कार्यालयीन कामकाज सांभाळून नियमित सराव करून हे सादरीकरण साकारले.या कार्यक्रमात मी मराठी परिवार रियाध तर्फे सौदीतील महाराष्ट्र समुदायाच्या वतीने भारताचे राजदूत डॉ. सुहैल एजाज खान यांचा विशेष सत्कार करण्यात आला.‘प्रवासी परिचय 2025’ हा कार्यक्रम भारतीय समुदायासाठी एक सांस्कृतिक मेजवानी ठरली असून भारताच्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. महाराष्ट्राच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले आणि सीमापार महाराष्ट्राची संस्कृती प्रभावीपणे सादर केली गेली. ही कामगिरी अत्यंत गौरवाची असून त्यांनी महाराष्ट्राची ओळख जागतिक स्तरावर पोहोचवली आहे.मराठी परिवार रियाध सौदी अरेबिया येथे मागील 10 वर्षांपासून कार्यरत आहे आणि समुदायासाठी सामाजिक, सांस्कृतिक सेवेसाठी कायम कार्यरत आहे. दरवर्षी येथे दिवाळी, नवरात्री, होळी, महाराष्ट्र दिन यासारखे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच सौदी अरेबिया येथे कामानिमित्त असलेल्या मराठी समुदायासाठी सर्व प्रकारची मदत केली जाते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ