Chandrakant Patil on Neet Exam : ‘आंबा चोरी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य एकच का?’; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर अमित ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

spot_img

पेपरफुटीची तुलना थेट आंबा चोरीशी केल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेपरफुटी प्रकरणाची तुलना थेट आंबा चोरीशी केल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. “एखाद्याने आंबा चोरल्यास त्याला फाशी दिली जात नाही, समज दिली जाते,” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप करत राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली. आंबा चोरीला गेल्यास दुसरा विकत घेता येतो, पण पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं विद्यार्थ्यांचं भविष्य आणि आत्महत्या केलेल्या मुलांचे प्राण कुठल्या बाजारात मिळणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याची अशी थट्टा करणाऱ्या मंत्र्यांकडे उच्च शिक्षण मंत्रालय असणे ही महाराष्ट्राची शोकांतिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, मनसे नेते अमित ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटलांवर कडक शब्दात ताशेरे ओढले. पेपरफुटीच्या घटनांमुळे अनेक मुला-मुलींनी आत्महत्या केल्या आहेत, आणि मंत्री त्याची तुलना आंबा चोरीशी करत आहेत, यावरून ते भरकटले असल्याची टीका त्यांनी केली. भाजपच्या नेत्यांनाही आता देश पेटला असल्याचे समजत असल्याचा टोला त्यांनी लगावला असून, या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ