आंदोलनांच्या भरवशावर राजकीय पोळी भाजणे बंद करा; विरोधकांकडे हिंमत असेल तर संसदेत उत्तर आ-वाहन, मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप.
दिल्लीत NEET परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि विरोधकांना थेट संसदेत चर्चा करण्याचे उघड आव्हान दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी विरोधकांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. “राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडवावा आणि लोकशाहीच्या नियमांनुसार संसदेत चर्चा करावी, कारण निर्णय रस्त्यावर नाही तर संसदेत होतात,” असे सांगत त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून राजकारण करणे थांबवावे, असा टोला लगावला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य दिले असून पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचा निश्चय केला आहे. विरोधकांना केवळ अराजकता माजवायची आहे, म्हणूनच ते संसदेत चर्चा टाळत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कर्नाटक, तेलंगणा आणि पंजाबमधील पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत काँग्रेस आणि ‘आप’ सरकारवर निशाणा साधला, तसेच महाराष्ट्रातील तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळातील टीईटी (TET) घोटाळ्याचा दाखला देत नापास लोकांना पास करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. विरोधकांच्या या भूमिकेमुळे राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.




