Dharmendra Pradhan : आज राजीनाम्याच्या मागणीला सामोरे जाणारे धर्मेंद्र प्रधान २९ वर्षांपूर्वी पेपरफुटीविरोधातच उतरले होते रस्त्यावर!

spot_img

NEET-UG पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांवरून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, याच पेपरफुटीच्या मुद्द्यावरून तब्बल २९ वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचे माजी सहकारी प्रशांत राऊत यांच्या माहितीनुसार, १९९७ मध्ये ओडिशात पेपरफुटीचे एक मोठे प्रकरण समोर आले होते. त्या वेळी तरुण नेते म्हणून सक्रिय असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांना एकत्र करत आंदोलनाचे नेतृत्व केले. सुमारे १,५०० विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी होत पेपरफुटीविरोधात जोरदार निदर्शने केली होती.

आंदोलनाला मोठे स्वरूप मिळाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचे सांगितले जाते. या कारवाईत धर्मेंद्र प्रधान गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापती झाल्या, तसेच त्यांना हाडांचे फ्रॅक्चरही झाले होते, असा दावा प्रशांत राऊत यांनी केला आहे.

आज मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. NEET-UG प्रकरणावरून विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्यावरच प्रश्न उपस्थित करत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासातील १९९७ मधील आंदोलनाची आठवण विशेष चर्चेत आली आहे.

दरम्यान, सध्याच्या NEET प्रकरणावर धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षणाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांना केवळ आश्वासने नव्हे, तर योग्य उत्तरे, सुधारणा आणि पारदर्शकता देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ