चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त थिएटर्सबाहेर रोषणाई, लेझर शो आणि डान्सचा महापूर; विजयच्या भावनिक एक्झिटमुळे चाहत्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह.
तमिळनाडूचे नेते आणि साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांच्या करिअरमधील अखेरचा चित्रपट असलेला ‘जन नायकन’ अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांनी या दिवसाचे स्वागत एखाद्या मोठ्या सणासारखेच केले आहे. संपूर्ण तमिळनाडूमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत असून, थिएटर्सबाहेर ढोल-ताशांच्या गजात डान्स, लेझर शो, ड्रोन शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे जल्लोषात आयोजन करण्यात आले आहे. चाहत्यांसोबतच विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे कार्यकर्तेही या आनदात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
‘जन नायकन’ हा थलपती विजय यांच्या अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीचा हा चित्रपट असल्याने चेन्नईच्या वूडलँड्स आणि कसिनो यांसारख्या थिएटर्सबाहेर रात्रीपासूनच रोषणाई आणि उत्सवाचे वातावरण होते. दरम्यान, चित्रपटाच्या या ग्रँड रिलीजवर प्रतिक्रिया देताना तमिळनाडूचे परिवहन मंत्री विजय तामिळन पार्थिबन यांनी हा सण दिवाळी आणि पोंगलपेक्षाही मोठा असल्याचे म्हटले, तर टीव्हीकेचे आमदार के. व्ही. विजयधामू यांनी एक सामान्य चाहता म्हणून चित्रपटाचा आनंद घेत चेन्नईमध्ये सुमारे १०० लोकांना हेल्मेट वाटण्याची घोषणा केली. दक्षिणेकडील परंपरेनुसार अनेक ठिकाणी थलपती विजय यांच्या कटआउट्सवर दुग्धाभिषेक, अन्नदान आणि जोरदार आतषबाजी करण्यात आली. एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या राजकीय आणि एक्शनपॅक चित्रपटात विजय यांच्यासह पूजा हेगडे, बॉबी देओल, मामिता बैजू, गौतम मेनन, प्रकाश राज आणि नारायण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.




