बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम केवळ दमदार अभिनय आणि फिटनेससाठीच नव्हे, तर व्यवसाय आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीसाठीही ओळखला जातो. आता त्याने मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित वांद्रे पश्चिम परिसरात तब्बल ८४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक बंगला खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सेंट मार्टिन रोडवरील हा बंगला १९२६ मध्ये बांधण्यात आला असून, यापूर्वी तो डेविट्रे या पारशी कुटुंबाच्या मालकीचा होता.
या आलिशान बंगल्यात चार बेडरूम, प्रशस्त हॉल, फळझाडांनी सजलेली बाग आणि आउटहाऊस आहे. ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून जॉन प्रभावित झाला असून, हा बंगला पाडून नव्याने बांधण्याऐवजी त्याचे मूळ स्वरूप जपण्याची त्याची इच्छा असल्याचे सांगितले जाते. मालमत्तेच्या सह-मालकांनीही ही वास्तू टॉवर उभारण्यासाठी विकण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले होते.
जॉनची मुंबईतील ही पहिली मोठी मालमत्ता गुंतवणूक नाही. २०२३ मध्ये त्याने खार येथील तीन मजली इमारत सुमारे ७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. याशिवाय वांद्रे परिसरात त्याची यापूर्वीही मालमत्ता आहे. त्यामुळे या नव्या खरेदीमुळे जॉन अब्राहमच्या रिअल इस्टेटमधील वाढत्या रुचीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.




