दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तरुण आंदोलकांवर झालेल्या कारवाईचा विविध राजकीय पक्षांकडून निषेध होत असून, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले असून, त्यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.
दिल्लीत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली असून, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही फोनवर संवाद होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चर्चेत जंतर-मंतरवरील आंदोलन, आंदोलकांवरील कारवाई आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विचारविनिमय होऊ शकतो.
मात्र, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दोन्ही नेत्यांकडूनही यासंदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या संभाव्य संवादाकडे महाराष्ट्रासह देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




