Satara Waterfalls : मुसळधार पावसानंतर साताऱ्यात निसर्गाचा जल्लोष; धबधबे ओसंडले, पर्यटकांची मोठी गर्दी

spot_img

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना पुन्हा एकदा हिरवाईचे आणि जलधारांचे अप्रतिम रूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अनेक धबधबे पावसामुळे पूर्ण क्षमतेने वाहू लागले असून, निसर्गाचा हा अद्भुत नजारा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने विविध पर्यटनस्थळांकडे धाव घेत आहेत.

कास रोड, वजराई, ठोसेघर, लिंगमळा आणि केळवली धबधब्यांवर सध्या पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून वाहणारे पाणी परिसराला आणखी आकर्षक बनवत आहे. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असलेला भांबवली वजराई धबधबा तब्बल 1,840 फूट उंचीवरून तीन टप्प्यांत कोसळत असून, त्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे.

साताऱ्याजवळील ठोसेघर धबधब्यातून कोसळणाऱ्या जलधारा पाहण्यासाठी विशेषतः शनिवार-रविवारी मोठी गर्दी होत आहे. तर महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधब्याभोवती धुक्याची चादर, थंड वारे आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह यामुळे वातावरण अधिकच मनोहारी झाले आहे. परळी खोऱ्यातील केळवली धबधबाही पुन्हा प्रवाहित झाल्याने निसर्गप्रेमींची पावले या भागाकडे वळत आहेत.

मात्र धबधब्यांवर वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून, धबधब्यांच्या कड्यांजवळ किंवा पाण्याच्या प्रवाहात जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सुरक्षित अंतर राखूनच निसर्गाचा आनंद घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ