Sanjay Raut : “ते लोकशाहीचे ‘सिरीयल किलर’…” खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती हल्ला

spot_img

राज्यातील राजकीय घडामोडींना आता पुन्हा एकदा वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर अत्यंत तीव्र शब्दांत तोफ डागली. ही घडामोड म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचा आरोप करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांचा संताप अनावर झाला. बंडखोर खासदारांवर कडक शब्दांत टीका करताना ते म्हणाले की, “हे खासदार निर्लज्ज असून त्यांच्यासाठी गद्दार हा शब्दही फिका पडेल. हा प्रकार म्हणजे लोकशाहीवर थेट बलात्कार आणि खून आहे.” सत्ताधाऱ्यांवर ५०-५० कोटी रुपयांना लोक विकत घेत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी, “जनतेला खायला अन्न नाही, लोक उपोषणाला बसले आहेत आणि हे लोकशाहीचे ‘सिरीयल रेपिस्ट’ आणि ‘सिरीयल किलर’ बनून फिरत आहेत,” अशा तिखट शब्दांत हल्ला चढवला.

या राजकीय लढाईत आता ठाकरे गट आक्रमक पवित्र्यात असून ‘राम रक्षा आंदोलन’ देशभरात घेऊन जाणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले. महाविकास आघाडीचे सर्व नेते या आंदोलनात सोबत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघप्रमुख मोहन भागवत यांना आमंत्रित करूनही ते आंदोलनात न आल्यामुळे, “रामाचे मंदिर लुटणाऱ्यांनाच त्यांचा पाठिंबा आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरली. “एकनाथ शिंदे म्हणजे काही आचार्य विनोबा भावे नाहीत. केवळ दाढी वाढवली म्हणजे त्यांचे बोलणे सत्य ठरत नाही,” असे म्हणत त्यांनी पैशांच्या जोरावर मशालीवर निवडून आलेले खासदार विकत घेतल्याची टीका केली. “यात कसली मर्दुमकी आणि शौर्य आहे?” असा सवाल करत त्यांनी, “एक दिवस कोणीतरी ‘हनुमान’ येईल आणि ही दाढी जाळून टाकेल; तुमची नीतिमत्ता अमित शाह यांच्या पायाशी गहाण आहे,” असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांना दिला. या वादळी पत्रकार परिषदेमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ