सोनम रुघवंशी, सिया गोयल नंतर आता कर्नाटकच्या धारवाडमध्ये नृशंस घटना; फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा, संशयित नेत्ररोगतज्ज्ञ पत्नी पोलिसांच्या ताब्यात
गेल्या काही दिवसांत देशभरातून नात्यांना काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. हनिमून दरम्यान पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवणारी सोनम रुघवंशी असो, वा होणाऱ्या पतीला लोहगडावरून ढकलून देणारी सिया गोयल; महिलांकडून होणाऱ्या या भीषण गुन्ह्यांमुळे समाज हादरलेला असतानाच, आता कर्नाटकच्या धारवाड शहरात याहूनही भयंकर आणि नृशंस प्रकार उघडकीस आला आहे. एका उच्चशिक्षित डॉक्टर कुटुंबात घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
धारवाडमधील पवन हायस्कूलसमोरील एका उच्चभ्रू अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर राहणारे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ (Anaesthetist) डॉ. किरण होन्नावर (वय ४५) यांची त्यांच्याच फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला, तर त्यांचा अवघा ८ वर्षांचा निष्पाप मुलगा घरात गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत सापडला. मुलाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बुधवारी डॉ. किरण यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा फोन त्यांची पत्नी आणि नामवंत नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologist) डॉ. प्रियंका कट्टनहल्ली हिने उचलला. “ते विश्रांती घेत आहेत” किंवा “ते ड्युटीवर गेले आहेत” अशी उडवाउडवीची उत्तरे तिने दिली. यामुळे संशय बळावल्याने नातेवाईकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य पाहून पोलिसांचेही काळीज हरपले.
या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर बनवलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले की, एका खोलीत पतीचा मृतदेह पडलेला होता, तर बाजूलाच ८ वर्षांचा मुलगा वेदनेने विव्हळत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. परंतु, या अत्यंत भीषण प्रसंगाचे काहीच सोयरसुतक नसल्यासारखी, एम.एस. (MS) पदवीधारक डॉक्टर पत्नी प्रियंका बेडवर आरामात झोपून अत्यंत बेफिकीरपणे मोबाईल वापरत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा दुःख नव्हते.
पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात बाहेरच्या व्यक्तीने जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. घटना घडली तेव्हा घरात केवळ पती, पत्नी आणि मुलगाच होते. पोलिसांनी संशयित पत्नी डॉ. प्रियंका हिला तात्काळ ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक पथकाने (Forensic Team) घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद की मानसिक विकृती? या हत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.




