“जयंत पाटील तिथे नव्हतेच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका”; अजित पवार गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही तटकरांचे मोठे विधान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादीचे (अजित पवार गट आणि शरद पवार गट) बडे नेते एकत्र आल्याच्या चर्चांनी महाराष्ट्र ढवळून निघाला होता. अजित पवार गटाचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी एकत्र मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर आज राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून ‘वर्षा’वर नक्की काय घडले, याचे सत्य समोर आणले आहे.
सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, ‘वर्षा’ बंगल्यावर त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान जयंतराव पाटील तिथे उपस्थित नव्हते. “जयंत पाटील आले, आम्ही एकत्र गेलो आणि अर्थखाते मागितले, या चर्चांना काहीच आधार नाही. जयंतरावांच्या भेटीचा आणि आमच्या भेटीचा काडीमात्र संबंध नाही. जयंत पाटील हे राज्याचे माजी अर्थमंत्री आणि वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी स्वतः काल त्यांच्या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे,” असे तटकरे म्हणाले. आपल्या मतदारसंघातील कामांसाठी आपण आधीच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि प्रफुल्ल पटेल यांना बाहेर जायचे असल्याने तेही सोबत आले होते, असा खुलासा त्यांनी केला.
या भेटीची कल्पना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि नेते पार्थ पवार यांना नव्हती, या वृत्ताचेही तटकरेंनी जोरदार खंडन केले. ते म्हणाले, “आमच्यात अतिशय उत्तम ट्युनिंग आहे. जेव्हा जेव्हा राजकीय बैठका असतात, तेव्हा सुनेत्रा वहिनींना त्याची पूर्ण कल्पना असते. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे आणि मला राजशिष्टाचाराची पूर्ण माहिती आहे.”
या पत्रकार परिषदेत तटकरेंनी एक मोठी माहिती दिली. “जेव्हा अजित पवार (सीनियर) हयात होते, तेव्हा विलीनीकरणाच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या होत्या. परंतु, त्यांच्या निधनानंतर या चर्चा पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच, संसद बिलाला समर्थन देण्यावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, “एखाद्या बिलाला पाठिंबा देणे म्हणजे एनडीए (NDA) मध्ये सामील होणे असा होत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवक, महिला, युवती आणि मुंबई अध्यक्ष अशी रिक्त असलेली सर्व पदे लवकरच भरली जातील, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच गाजत असलेल्या ‘लवासा’ प्रकरणावर बोलताना तटकरे म्हणाले की, “मी या प्रकरणाचा साक्षीदार होतो. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असून त्यात तथ्य शून्य होते. यावरून देशाची न्यायव्यवस्था किती मजबूत आहे हे सिद्ध होते आणि आता या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.”




