Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची जोरदार पुनरागमनाची चिन्हे; 20 जुलैनंतर मुसळधार सरींचा अंदाज

spot_img

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून, आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा तसेच बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश परिसरातील चक्राकार वाऱ्यांचा परिणाम हवामानावर होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोलापूर, धाराशिव आणि कोकणातील काही भागांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे काही दिवस मान्सूनच्या हालचाली मंदावल्या होत्या. मात्र, या वाऱ्यांचा प्रभाव लवकरच कमी होणार असून 20 जुलैपासून राज्यभरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, सांगली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने आता पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. आगामी काही दिवस राज्यातील बहुतांश भागांत चांगल्या पावसाची शक्यता असल्याने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायक मानली जात असून, पुढील आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा जोर पाहायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ