“आंदोलकांचा बळी घेऊ नका”; नीट परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरणी मनसे प्रमुखांची सत्तेतील ‘अदृश्य बॉस’वर सडकून टीका
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आमरण उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. देशभरातील पेपरफुटी आणि ‘नीट’ (NEET) परीक्षांमधील गैरव्यवहारांच्या निषेधार्थ ते दिल्लीच्या जंतर-मंतरवर लढत आहेत. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या समर्थनार्थ अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक सविस्तर पत्र लिहून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, सोनम वांगचुक ज्या मागण्यांसाठी लढत आहेत, त्या अत्यंत रास्त आहेत. परंतु, हे सरकार अत्यंत निर्ढावलेल्या मानसिकतेचे आहे. “जिथे प्रभू श्रीरामाच्या तिजोरीची लूट होत असताना हे सरकार शांत बसून राहू शकते, तिथे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणुका मॅनेज करण्यासाठी प्रचंड पैसा वापरला जात असून, बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून केवळ विरोधकांना बदनाम करण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
नेहरूंपेक्षा जास्त काळ पंतप्रधान पदावर राहिल्याचा आनंद साजरा करणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी सुनावले की, “किती दिवस सत्तेवर राहिलात हा केवळ एक आकडा आहे. पण जर तुम्ही देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘नीट’ (NEET) घोटाळ्यावर आणि पेपरफुटीवर ठाम निर्णय घेतला, तरच त्या आकड्याला काही अर्थ उरेल, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला लक्षात ठेवणार नाही.” ‘नीट’चा विषय राजकीय नसून थेट सामाजिक आहे आणि यामुळे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्या मुलांनाही मनस्ताप झाला असणार, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज ठाकरेंनी देशातील सुजाण नागरिकांना (Civil Society) सोशल मीडियाच्या ‘लाईक्स आणि शेअर्स’च्या दुनियेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “आपण जर केवळ स्क्रीनवरच व्यक्त होत राहिलो, तर हे सरकार एका काय, अनेक सोनम वांगचुक यांच्यासारख्या प्रामाणिक आंदोलकांना चिरडून टाकेल. सध्या समाजात जी एक विचित्र, तणावयुक्त शांतता पसरली आहे, ती भविष्यात स्मशानशांततेत बदलू देऊ नका.”
शेवटी, “तपास यंत्रणा हाताशी धरून आलेला सत्तेचा माज उतरवण्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे. मनसे पूर्ण ताकदीने सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे,” असा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला आहे.




