बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रानमाळा गावात शेतीतील सततच्या संकटामुळे एका २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. मुकुंद गंगाराम हिंगे या तरुण शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, दुबार पेरणीचे संकटही उभे ठाकल्याने ते तीव्र मानसिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. आवश्यक पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, कमी पावसामुळे बीड जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा मोठा फटका बसत आहे. आर्थिक अडचणींसोबतच मानसिक तणावही वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच प्रभावी दिलासादायक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ही घटना पुन्हा एकदा शेती आणि शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे.




