सचिव सच्चिदानंद सिंहांच्या नोटीसमुळे अजितदादांच्या पक्षात खळबळ; आता शिस्तपालन समितीचे प्रमुख जय पवार काय पाऊल उचलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अंतर्गत कलह आता अधिक गडद होताना दिसत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच पक्षाचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर आक्षेप घेतला असून, ही निवड पक्ष घटनेला धरून नसल्याची नोटीस त्यांनी पाठवली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली असून, सच्चिदानंद सिंह यांनी हे पाऊल स्वतःहून उचलले आहे की यामागे पक्षातीलच एखाद्या मोठ्या नेत्याचे डोके आहे, याचा शोध आता वरिष्ठ पातळीवर सुरू झाला आहे.
या संपूर्ण वादात आता सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र आणि पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेतात आणि सिंह यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, हा वाद म्हणजे पक्षात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचीच पुढची आवृत्ती आहे. यापूर्वी पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार असा उघड गटबाजीचा सामना पाहायला मिळाला होता. फेब्रुवारी महिन्यात प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाशी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात थेट रद्द केला होता. त्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख केवळ ‘गटनेते’ असा करण्यात आल्यामुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
पक्षातील या नवीन घराणेशाहीला आणि तरुण नेतृत्वाला कंटाळून अजितदादा गटातील काही मोठे नेते थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटायला गेल्याची माहिती समोर आली आहे. या नेत्यांनी अजित पवार यांच्या गोटात सुरू असलेल्या सर्व घडामोडी शरद पवारांच्या कानावर घातल्या आणि त्यांनी मध्यस्थी करून पार्थ व जय पवार यांना समजावून सांगावे, अशी विनंती केली. मात्र, “हा तुमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मी त्यात पडणार नाही,” असे सांगत शरद पवारांनी या वादात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला.
प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा-पार्थ पवार या संघर्षाला ४ महिने उलटून गेले तरी नेत्यांच्या अधिकृत पदांविषयीचा संभ्रम पक्षाने अजूनही दूर केलेला नाही. निवडणूक आयोगाला याबाबत नवीन पत्र पाठवले की नाही, हेही स्पष्ट नाही. याच संशयास्पद वातावरणात आता थेट राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीलाच आव्हान दिले गेल्यामुळे, यामागे पडद्याआडून कोण गेम खेळत आहे, याचा कसून शोध सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांकडून घेतला जात आहे.




