वसई-विरारमधील नालासोपारा परिसरात नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना नागरिकांच्या तीव्र नाराजीचा सामना करावा लागला. मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. घरांमध्ये पाणी शिरणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक अडचणींना स्थानिकांना सामोरे जावे लागले. मात्र, या संपूर्ण संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेविका प्रज्ञा पाटील नागरिकांच्या मदतीसाठी दिसल्या नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आणि परिसरात नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू झाल्यावर प्रज्ञा पाटील घटनास्थळी पोहोचल्या. याच वेळी संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर केवळ कामाचे श्रेय घेण्यासाठी आल्याचा आरोप करत तीव्र विरोध दर्शवला. नागरिकांनी त्यांना घेराव घालत ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या, त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती बिघडू नये म्हणून स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकारामुळे पूरकाळातील प्रशासनाच्या कामकाजाबरोबरच लोकप्रतिनिधींची उपस्थिती आणि विकासकामांच्या श्रेयवादाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांनी संकटकाळात प्रत्यक्ष मदत करणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करत केवळ उद्घाटन किंवा श्रेय घेण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.




