Mumbai Crime : मुंबई पुन्हा हादरली! पायधुनीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर वॉचमनचा पाशवी अत्याचार; संतप्त जमावाने नराधमाला दिला चोप

spot_img

रक्तबंबाळ अवस्थेत सापडली निष्पाप मुलगी; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आज कोर्टात रिमांडसाठी करणार हजर

पुण्यातील नरसापूर येथील साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच, आता मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका गोदामात काम करणाऱ्या ३२ वर्षीय वासनांध सुरक्षा रक्षकाने (वॉचमन) अवघ्या ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या पाशवी कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ही चिमुरडी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. याच दरम्यान इमारतीजवळ तैनात असलेल्या या वासनांध वॉचमनची नजर तिच्यावर पडली. त्याने संधी साधून मुलीला गोदामाच्या पोटमाळ्यावर नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बराच वेळ मुलगी घरी न आल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी तिची शोधशोध सुरू केली. अखेर शोध घेत असताना, ती गोदामाच्या पोटमाळ्यावर अत्यंत गंभीर आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली.

मुलीची ती भयानक अवस्था पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटना समजताच परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. त्यांनी त्या नराधम वॉचमनला जागेवरच पकडून चांगला झोडपून काढले आणि त्यानंतर पायधुनी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नराधमाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीची प्रकृती सुरुवातीला अत्यंत नाजूक असल्याने तिला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र पुढील उपचारांसाठी तिला तात्काळ जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, रविवारी मध्यरात्री १२.५५ च्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात आरोपी वॉचमनलाही वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे तब्बल ३ तास त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पहाटे त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

चिमुरडीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या विकृत आरोपीला आज (सोमवारी) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टात पोलीस कोठडीच्या (रिमांड) मागणीसाठी हजर केले जाणार आहे. या नराधमाने यापूर्वीही असे काही गुन्हे केले आहेत का, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईत महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ