Kandivali Crime : फोनमधील नंबर डिलीट करायचा अन् ब्लॉक करायला लावायचा; कांदिवलीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर डिलिव्हरी बॉय सूरज वाघमारेचा थरारक खुलासा!

spot_img

एकतर्फी प्रेमातून आणि संशयातून चेहऱ्यावर केले १६ वार; आत्महत्येचे नाटक रचून दबाव आणणाऱ्या २२ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या.

मुंबईच्या कांदिवली परिसरात घडलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या निर्घृण हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज वाघमारे (वय २२ वर्षे) याला कांदिवली पोलिसांनी गुन्ह्यााच्या अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुरज हा व्यवसायाने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आणि त्याने केवळ संशयाच्या आणि विकृत मानसिकतेच्या भरात या निष्पाप मुलीचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरजचे या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते आणि तो तिच्यावर सतत संशय घ्यायचा. त्याचा संशयी स्वभाव इतका टोकाचा होता की, तो बळजबरीने त्या मुलीच्या मोबाईलमधील इतर मुलांचे नंबर स्वतः डिलीट करायचा आणि त्यांना ब्लॉक करायला लावायचा. तिने इतर कोणत्याही मुलाशी बोलू नये म्हणून तो तिच्यावर सतत मानसिक दबाव टाकायचा. यापूर्वीही त्याने तिला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी आणि मनवण्यासाठी अनेकदा आत्महत्येचे खोटे नाटक केले होते, तसेच तिलाही आत्महत्येची धमकी दिली होती. त्याच्या अशा विकृत वागण्याला त्याच्या परिसरातील इतर मुलीही कंटाळल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी संशयाचे भूत डोक्यात संचारलेल्या सूरजने रागाच्या भरात या विद्यार्थिनीवर चाकूने अत्यंत निर्घृणपणे वार केले. पोस्टमार्टम (शवविच्छेदन) अहवालानुसार, नराधम सूरजने तिच्या चेहऱ्यावर १६ पेक्षा जास्त वार करून तिची क्रूर हत्या केली. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने त्याने तो कांदिवली पूर्वेकडील दामूनगर, सातारा कॅम्पजवळील घनदाट जंगल परिसरात फेकून दिला होता. सूरज वाघमारे हा दामूनगर भागातील लहूगड येथील सरस्वती चाळीत राहणारा आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवून त्याचा माग काढला. सध्या आरोपी कांदिवली पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे कांदिवली परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ