IND vs ENG : आयपीएलच्या सपाट खेळपट्ट्या नडल्या! भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोवर इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने डागले थेट शरसंधान

spot_img

इंग्लंडविरुद्ध भारताची दैना; तिसऱ्या सामन्यात ७६ धावांवर गाशा गुंडाळल्यानंतर इंग्लिश गोलंदाजाचा भारतीय क्रिकेट सिस्टीमला घरचा आहेर

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाची पुरती दैना उडालेली पाहायला मिळत आहे. आज या मालिकेतील चौथा सामना खेळवला जात असून, संघात एकापेक्षा एक तगडे आणि स्टार फलंदाज असतानाही टीम इंडियाला मैदानावर विजयासाठी एवढा संघर्ष का करावा लागतोय? असा संतप्त प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा संपूर्ण डाव अवघ्या ७६ धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने १२५ धावांच्या अवाढव्य फरकाने भारताला धूळ चारली. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर, जी गोष्ट भारतीय संघ व्यवस्थापनाला उमजली नाही ती इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने जगासमोर मांडली आहे. आर्चरने थेट आयपीएलमधील (IPL) सपाट खेळपट्ट्यांवर निशाणा साधत भारतीय फलंदाजांच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

इंग्लंडमधील कठीण आणि गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. भारताचा डाव ७६ धावांवर गुंडाळण्यात जोफ्रा आर्चर (३ षटकांत २९ धावा, ३ बळी) आणि जोश टंग (२८ धावा, ४ बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने पहिल्या ५ षटकांतच आपले ५ मुख्य फलंदाज गमावले होते.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जोफ्रा आर्चरने भारत आणि इंग्लंडमधील क्रिकेटच्या परिस्थितीतील फरक स्पष्ट केला. आर्चर म्हणाला, “इंग्लंडमध्ये गोलंदाजी करताना चेंडू योग्य रेषेवर आणि अचूक टप्प्यावर (Line & Length) टाकणे अत्यंत गरजेचे असते. भारतात मात्र परिस्थिती या उलट आहे. तिथल्या खेळपट्ट्या फक्त आणि फक्त फलंदाजांच्या फायद्यासाठी बनवल्या जातात, शिवाय तिथल्या सीमा (Boundaries) देखील खूप लहान असतात.”

आयपीएलच्या सपाट खेळपट्ट्यांवर टीका करताना आर्चर पुढे म्हणाला, आयपीएलमध्ये गोलंदाजाने केलेली एक छोटीशी चूकही महागात पडते. तिथे २०० धावा फलकावर लावूनही संघ सुरक्षित नसतात, गोलंदाजांना सतत धाकधुकीत राहावे लागते. इंग्लंडमध्ये खेळपट्ट्यांमुळे गोलंदाजांना चुका सुधारण्यासाठी थोडी अधिक संधी मिळते. तिसऱ्या सामन्यात २०० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर आम्हाला माहित होते की हा सामना जिंकण्यासाठी भारताला एखादी चमत्कारीक किंवा विशेष खेळीच करावी लागेल, जी त्यांना जमली नाही.

भारतीय संघाने मार्चमध्ये टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. परंतु, त्यानंतर झालेल्या आयपीएलच्या हंगामापासून भारतीय संघाची घसरण सुरू झाली आहे. आयपीएलनंतर आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला तेथे मालिका ०-२ अशी गमवावी लागली. आता इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर सलग दोन सामने गमावून भारतीय संघ १-२ ने मागे पडला आहे.

आजचा चौथा सामना भारतासाठी ‘करा किंवा मरा’ असा आहे. ही ५ सामन्यांची मालिका अनिर्णित राखण्याची एकमेव संधी आता भारताकडे उरली असून, त्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. मात्र, आर्चरने उपस्थित केलेल्या मुद्द्यांनंतर भारतीय फलंदाज इंग्लंडच्या स्विंग आणि बाऊन्सचा सामना कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ