महाराष्ट्र राजभवनात कर्तव्यावर असताना राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर येथील एसआरपीएफ गट-16 मधील कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे यांनी आपल्या सर्व्हिस एसएलआर रायफलमधून गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तपासादरम्यान काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे यांचे मीरा-भाईंदर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वैयक्तिक संबंध होते. दोघांमध्ये विवाहाबाबत चर्चाही झाल्याचे समोर आले आहे. मात्र, नंतर संबंधित महिलेने लग्नास नकार दिल्याचे आणि त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत निश्चित केल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. या घडामोडींनंतर कौस्तुभ मानसिक तणावात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
याचदरम्यान, संबंधित महिलेचे लग्न ठरल्यानंतर कौस्तुभ यांनी तिच्यासोबतचे काही खासगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या कृतीमागील उद्देश काय होता, त्यातून कोणताही वाद निर्माण झाला होता का किंवा या सर्व घटनांचा आत्महत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील अनेक बाबी अद्याप तपासाच्या टप्प्यात असून पोलिसांकडून अधिकृत निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व पुरावे, डिजिटल माहिती आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




