बोगस लाभार्थ्यांना चाप आणि भ्रष्टाचाराचा अंत; थेट बँक खात्यात सरकारी मदत जमा करणाऱ्या ‘डीबीटी’ आणि ‘आधार’चे नेमके गणित काय?
आधार कार्ड हे केवळ ओळखीचा एक वैध पुरावा आहे की नाही, यावरून अनेकदा कायदेशीर आणि सामाजिक वाद होत राहतात. आजच्या काळात आधार कार्डचे पूर्वीसारखे अप्रूप राहिले नसले, तरी त्याचे महत्त्व आणि व्याप्ती प्रचंड वाढली आहे. आता आधार केवळ पाकिटात ठेवण्याचा एक दस्तऐवज राहिला नसून, आर्थिक व्यवहारांचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा बनला आहे.
आज अनेक गावांमध्ये किंवा शहरांमधील केंद्रांवर ‘इथे आधार कार्डच्या मदतीने पैसे काढून मिळतील किंवा दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून मिळतील’ असे फलक आपण नेहमी पाहतो. कोणत्याही दलालाशिवाय आणि कोणतीही दिरंगाई न होता, अवघ्या काही सेकंदांत आधार कार्डच्या मदतीने सर्वसामान्यांच्या खात्यात पैसे कसे येतात आणि बँक खात्यातून पैसे कसे काढले जातात, याची रंजक आणि महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
आधार कार्डमध्ये प्रत्येक नागरिकाची बायोमॅट्रिक माहिती (फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांचे स्कॅनिंग म्हणजेच आयरिस) आणि डेमोग्राफिक माहिती (नाव, वय आणि पत्ता) सुरक्षित केलेली असते. या अचूक माहितीमुळे सरकारी योजनांमध्ये होणारा मोठा भ्रष्टाचार थांबला आहे. कोणत्याही योजनेत बोगस किंवा बनावट लाभार्थी घुसणार नाहीत आणि एकच व्यक्ती दोनदा चुकीचा फायदा घेणार नाही, याची खात्री या यंत्रणेमुळे पटते.
सरकारी अनुदानाचा पैसा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ‘DBT’ म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण) ही विशेष प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे सरकारी सबसिडी, पेन्शन, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती किंवा कोणतीही आर्थिक मदत थेट गरिबांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
या सिस्टिमचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचे बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. ही खाती NPCI (National Payments Corporation of India – भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ) च्या केंद्रीय सिस्टिमशी जोडली जातात. जेव्हा सरकार एखाद्या योजनेचा निधी सोडते, तेव्हा तो पैसा कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ‘डीबीटी’ पोर्टलवरून निघतो आणि एनपीसीआयच्या मदतीने अचूकपणे संबंधित व्यक्तीच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतो. पैसे जमा होताच लाभार्थ्याला तात्काळ मोबाईलवर एसएमएस (SMS) येतो.
आधार कार्डच्या मदतीने पैसे काढण्याची आणि हस्तांतरीत करण्याची दुसरी पद्धत ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरत आहे, ज्याला AePS (Aadhaar Enabled Payment System) म्हटले जाते.
या पद्धतीमध्ये तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरशी जोडलेले असते. जर तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल आणि आसपास बँक किंवा एटीएम नसेल, तर तुम्ही जवळच्या ‘महाईसेवा केंद्र’ किंवा डिजिटल बँकिंग पॉइंटवर जाऊ शकता. तिथे बायोमॅट्रिक उपकरणावर (फिंगरप्रिंट स्कॅनर) फक्त तुमचा अंगठा ठेवून तुमच्या खात्यातील ओळख पटवली जाते. त्यानंतर संबंधित केंद्रचालक तुमच्या खात्यातून पैसे काढून तुमच्या हातात देतो किंवा तुमच्या सूचनेनुसार ते इतर कोणत्याही खात्यात वर्ग करतो. या सुरक्षित सुविधेसाठी केंद्रचालकांकडून अगदी किरकोळ सेवा शुल्क आकारले जाते आणि या व्यवहाराची संपूर्ण माहिती ग्राहकाला मोबाईलवर संदेशाद्वारे मिळते.




