Tukaram Munde : “ग्राहकांच्या ताटात शुद्ध दूध जाणारच…”; बदलीच्या अफवांवर मुंडेंचं कारवाईनेच सडेतोड उत्तर!

spot_img

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर आणि नियमबाह्य काम करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. राज्यातील नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मोठे छापे टाकले जात आहेत. या धडक कारवायांमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून व्यावसायिक चांगलेच धास्तावले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तुकाराम मुंढे यांच्या बदलीची जोरदार चर्चा रंगत असतानाच, मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज कारवायांचा धसका आणखी वाढवला असून थेट कारवाईनेच चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

याच मोहिमेचा एक भाग म्हणून आता धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अन्न व औषध प्रशासनाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. खवा, पेढे आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या भूम तालुक्यात भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात विनापरवाना साठवून ठेवलेली तब्बल ११२५ किलो दूध पावडर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत ६१ गोण्यांमधील सुमारे २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हा साठा बाळासाहेब घोडके नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे करून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

दुसरीकडे, नाशिकमधील काही प्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई केल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट दुधातील भेसळीकडे वळवला आहे. “ग्राहकांच्या ताटापर्यंत आणि मुलांच्या पोटापर्यंत शुद्ध दूध पोहोचणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे,” अशी ठाम भूमिका मुंढे यांनी मांडली आहे. नागरिकांना रासायनिक आणि भेसळमुक्त दूध मिळावे, यासाठी प्रशासनाकडून आता कडक पावले उचलली जात आहेत. यासाठी दूध उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांसाठी लवकरच अत्यंत कडक आणि नवे नियम लागू केले जाणार असल्याचे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, या मुंढे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सामान्य नागरिकांमधून मात्र या कारवाईचे मोठे स्वागत केले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ