मुंबईत महापालिकेच्या भ्रष्टाचारावरून आणि राम मंदिराच्या मुद्यावरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर आसूड
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी मिंधे-भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘रेनकोट’ घालून बाहेर पडावे, असा टोला त्यांनी लगावला. विकासाचा केवळ गाजावाजा केला जात असून त्याआड ३० ते ३५ टक्के दलाली आणि प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला. “मिसिंग लिंकवर केवळ दोन खड्डे पडल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, पण प्रत्यक्षात संपूर्ण मिसिंग लिंकच कोसळला आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारचा खोटेपणा उघड केला. इतकेच नव्हे तर, “या कथित विकासाचे इतके अजीर्ण झाले आहे की राज्याचे एक उपमुख्यमंत्री थेट ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
मुंबईतील दुर्घटनांवरून सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशून्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले की, एका बाजूला मुंबईत दुर्घटनांमध्ये ६ निष्पाप लोकांचा बळी गेला, तर दुसऱ्या बाजूला मुंबईच्या माजी महापौर एका बिल्डरच्या घरच्या बारशाला जाऊन फोटो काढण्यात व्यस्त होत्या आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष खिदीखिडी हसत होते. “महाराष्ट्र आणि मुंबईवर सध्या दुर्योधनाचे राज्य आले आहे,” अशा अत्यंत तिखट शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची गरजच नाही, कारण राज्यात काय चालले आहे हे समजण्याची त्यांची क्षमताच नाही, असेही ते म्हणाले. इतिहासामध्ये मुघलांनी हिंदूंची मंदिरे लुटल्याचा उल्लेख आहे, पण आज स्वतःला मंदिरांचे रक्षक म्हणवणारे भाजपचे लोकच अयोध्येतील राम मंदिर आणि केदारनाथ-बद्रीनाथसारख्या पवित्र मंदिरांमध्ये चोरी करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
शेवटी, मुंबई महापालिकेवर गेल्या साडेचार वर्षांपासून भाजपचाच ताबा असून त्यांनी संपूर्ण पालिका लुटल्याचा आरोप राऊत यांनी केला. मिठी नदीच्या नावाखाली सुरू असलेल्या घोटाळ्याचे लाभार्थी हे भाजपला देणग्या देणारे कंत्राटदार असून त्यात गौतम अदानी यांनाही मोठे काम मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कार्यकाळावर बोट ठेवणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना, “तुम्ही १२ वर्षांपासून सत्तेत आहात, मग तुम्ही काय केले?” असा सवाल त्यांनी विचारला. गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभाई पटेल यांच्या ३००० कोटींच्या पुतळ्याची खरी किंमत केवळ ३५० कोटी रुपये असल्याचा दावा एका चिनी वृत्तपत्राचा हवाला देत त्यांनी केला; उर्वरित अडीच हजार कोटी रुपये कोणी खाल्ले? असा प्रश्न विचारत गुजराती कंत्राटदार प्रभू श्रीराम, सीतामाई आणि सरदार पटेलांनाही सोडत नसल्याचे ते म्हणाले. महापालिकेतील या लुटीची आणि अधिकाऱ्यांच्या बळींची सर्व जबाबदारी सध्याच्या सत्ताधाऱ्यांचीच असल्याचे सांगत राऊत यांनी सरकारला धारेवर धरले.




