Health Insurance Discharge Rules : आता २ तासांच्या उपचारावरही मिळणार क्लेम; IRDAI चा मोठा निर्णय

spot_img

२४ तास ॲडमिट राहण्याची जुनी अट रद्द; रुग्णांना आणि नातेवाईकांना मोठा दिलासा

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे आता मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलिसिस, आणि कीमोथेरपी यांसारखे अनेक मोठे उपचार अवघ्या काही तासांत पूर्ण होतात. रुग्ण एकाच दिवसात बरा होऊन घरीही जातो. मात्र, विमा कंपन्यांच्या (TPA) जुन्या नियमांनुसार रुग्णालयात किमान २४ तास भरती राहणे बंधनकारक होते, ज्यामुळे अनेक रुग्णांना हक्काचा विमा नाकारला जायचा. आता विमा नियामक संस्था ‘इर्डा’ने (IRDAI) हा जाचक नियम शिथिल केला आहे. नवीन नियमांनुसार, रुग्णालयात केवळ दोन तास उपचार घेऊन डिस्चार्ज मिळाला तरीही रुग्णांना कॅशलेस मेडिक्लेमचा फायदा घेता येणार आहे.

अर्थात, हा नियम सरसकट सर्वच आजारांना लागू नसेल. तुमच्या विमा पॉलिसीच्या करारात ज्या आजारांचा आणि उपचारांचा (डे-केअर ट्रीटमेंट) उल्लेख असेल, त्याच उपचारांसाठी हा २ तासांचा कॅशलेस क्लेम वैध ठरेल. यासाठी ग्राहकांनी आपल्या विमा कंपनीशी संपर्क साधून कोणत्या उपचारांवर ही सवलत उपलब्ध आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. या सुविधेमुळे आता कमी वेळेत उपचार करणाऱ्या डे-केअर पॉलिसींची मागणी बाजारात लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय, IRDAI ने आणखी एक अत्यंत संवेदनशील आणि कडक नियम लागू केला आहे. दुर्दैवाने उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास, विमा कंपन्यांना रुग्णालयाचा संपूर्ण थकीत खर्च तातडीने मंजूर करावा लागेल. मृत्यूच्या दुःखात अडकलेल्या नातेवाईकांची कागदपत्रांसाठी आणि पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी नाहक फरफट होऊ नये, तसेच त्यांना अंत्यविधीची तयारी सन्मानाने करता यावी, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एकंदरीत, विमा क्षेत्रातील या डिजिटल आणि धोरणात्मक बदलांमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ