दोन ते तीन अयशस्वी प्रयोगांनंतर लोहगडावर काढला काटा; उद्या सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार, डिलीट चॅट्समधून भक्कम पुराव्यांची साखळी पोलिसांच्या हाती.
लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून ढकलून करण्यात आलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. १८ जून रोजी घडलेल्या या थरारक हत्याकांडाचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती आता एक नवा आणि अत्यंत महत्त्वाचा दुवा लागला आहे. केतनचा काटा काढण्यासाठी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी अनेक महिन्यांपूर्वीच रचलेला कट अखेर उघडकीस आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे की, केतनला मारण्याचे यापूर्वी २ ते ३ वेळा अयशस्वी प्रयत्न झाले होते; मात्र अखेर १८ जून रोजी लोहगडाच्या कड्यावर त्याचा गेम करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी चेतन चौधरी हा गुन्ह्याच्या दिवशी ओळख लपवण्यासाठी लोहगडावर डोक्यावरून ‘हुडी’ (Hoodie) घालून फिरत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून समोर आले आहे की, चेतन या संपूर्ण परिसरात केवळ ४० मिनिटेच होता. गडावर चढण्याचा आणि उतरण्याचा वेळ वजा केला, तर तो मोजून ५ ते १० मिनिटेच प्रत्यक्ष गडावर होता आणि याच काही मिनिटांत त्याने केतनला ३४० फूट खोल दरीत ढकलले. धक्कादायक बाब म्हणजे, गडावर चढताना चेतन हुडीच्या कपड्यांमध्ये दिसत असला, तरी तो घरातून निघताना आणि घरी परतताना मात्र त्याचे कपडे पूर्णपणे वेगळे होते. कोणालाही आपला संशय येऊ नये, म्हणून त्याने वाटेतच कपडे बदलल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. आता त्याने हे कपडे कुठे बदलले आणि ते कुठे लपवून ठेवले, याचा शोध पोलीस घेत आहेत. “दोनदा प्रयत्न फसला होता… अखेर तिसऱ्यांदा लोहगडाच्या एकांतात केतनला कड्यावरून ढकलून त्याचा गेम करण्यात आला.”
या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना लोहगड किल्ल्यावर नेऊन ‘क्राइम सीन रीक्रिएशन’ (Crime Scene Recreation) केले. यावेळी केतनच्या वजनाचा आणि उंचीचा एक पुतळा (डमी) कड्यावरून खाली फेकायला लावून पोलिसांनी तपासाची तांत्रिक बाजू भक्कम केली आहे. डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल्स डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिया आणि चेतन यांची ५ दिवसांची (३ जुलैपर्यंतची) पोलीस कोठडी उद्या संपत आहे. यापूर्वी न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला होता. आता गोळा केलेले नवीन पुरावे आणि कपडे बदलल्याच्या थिअरीसह पोलीस या दोन्ही आरोपींना उद्या तिसऱ्यांदा न्यायालयासमोर हजर करणार असून, तपासासाठी त्यांची कोठडी वाढवून मागण्याची दाट शक्यता आहे.




