भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘खाशाबा’ या चित्रपटाचा दमदार टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी अनेक यशस्वी आणि भव्य चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या जिओ स्टुडिओजने आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती केली असून, दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा एका प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कथानकासह प्रेक्षकांसमोर येत आहेत.
चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित झालेल्या ‘खाशाबा’च्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये पारंपरिक भारतीय कुस्तीचा वारसा, संघर्षमय जीवनप्रवास, प्रभावी दृश्यरचना आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळत आहे. टीझरमधील सिनेमॅटिक भव्यता आणि सादरीकरणामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भारतीय क्रीडा इतिहासात मानाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या संघर्ष, जिद्द आणि यशाचा हा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक झाले आहेत.




