“काहींनी कधी दगड उचलला नाही अन् ते आम्हाला शिकवतायत” आदित्य ठाकरेंना टोला; एकनाथ शिंदेंनी दिलेल्या जबाबदारीवर दिले सूचक संकेत
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा हादरा देत आमदार सचिन अहिर यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला असून, विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या आठवड्याभरात ६ खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाला बसलेला हा दुसरा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी थेट राजकीय चिखलफेक करणे टाळले असले, तरी त्यांनी आपल्या कृतीतून आणि सूचक शब्दांतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला असता, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील, ती मी पूर्ण ताकदीने पार पाडेन,” असे सांगत अहिर यांनी या लढतीचे संकेत दिले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनियुक्त शिवसेना नेते सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले, “माझ्यासारख्या सर्वसामान्य कामगार कार्यकर्त्याला उपसभापतीपदासारखा सर्वोच्च मान देऊन, तळागाळातील कार्यकर्ताही मोठ्या पदावर पोहोचू शकतो, हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करून दाखवले आहे. यापुढे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी काम करणार आहे. सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहेच, पण विधिमंडळात समाजातील उपेक्षित आणि कष्टकरी वर्गाला न्याय देण्याचे काम मी शिंदेंच्या नेतृत्वाखाली करेन.”
ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन अहिर म्हणाले, “काही जण आता माझ्यावर नक्कीच टीका करतील. जोपर्यंत आपण त्यांच्यासोबत आहोत, तोपर्यंत आपण खूप चांगले असतो. पण, वैचारिक मतभेदांमुळे बाजू बदलली की समोरचा व्यक्ती किती नालायक आहे, हे दाखवण्याचा पद्धतशीर प्रयत्न काही लोकांकडून केला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका करताना सचिन अहिर पुढे म्हणाले, “ज्या काही लोकांनी आयुष्यात कधी साधी चळवळ केली नाही किंवा एक दगडही उचलला नाही, ते आज आम्हाला राजकारण आणि निष्ठा शिकवायला निघाले आहेत. माझ्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना मी योग्य वेळी राजकीय व्यासपीठावरून चोख उत्तर देईन. उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी माझ्यावर विधिमंडळात जी जी जबाबदारी सोपवली, ती मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. मुंबईतील विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत माझे काय योगदान आहे, हे तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. मात्र, काहींना अजूनही असा भ्रम आहे की पक्षात जे काही आहे ते फक्त आम्हीच आहोत.” आता शिवसेनेत आल्यानंतर ग्रामीण भागात पक्षाची ताकद आणि संघटना कशी वाढवता येईल, याच एकाच ध्येयाने एकनाथ शिंदेंसोबत काम करणार असल्याचे सांगत त्यांनी आपल्या पुढील वाटचालीचे स्पष्ट संकेत दिले.




