‘ऑपरेशन टायगर’ नव्हे, हे देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत रोखण्यासाठी कुणाची तरी अंतर्गत खेळी; खासगी निधीसाठी पळालेल्या गद्दारांच्या भानगडी काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा
शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या अनपेक्षित बंडखोरीनंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी या शिवसेनेच्या पारंपारिक बालेकिल्ल्यात धडक दिली. “मी इथे कोणतीही जाहीर सभा घ्यायला आलेलो नाही, तर माझ्या प्रामाणिक शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी थेट मैदानात उतरून बंडखोरांवर तोफ डागली. परभणी आणि हिंगोलीचा इतिहास सांगताना त्यांनी, “इथून निवडून गेलेले लोक नंतर गद्दारी करतात, ही इथली विचित्र पार्श्वभूमी आहे. पण इथला मतदार आणि शिवसैनिक मात्र कधीही विकला गेला नाही, तो आजही ठाकरेंसोबतच खंबीरपणे उभा आहे,” अशा शब्दांत बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यावर तीव्र निशाणा साधला. तसेच, ज्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या खासदाराला मोठ्या आशेने विजयी केले होते, त्यांची आपण माफी मागायला आल्याचेही ते भावूक होत म्हणाले.
खासदार संजय जाधव यांच्यावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संसदेतील कामगिरीवरही बोट ठेवले. “हे लोक खासदार निधीसाठी नाही, तर स्वतःच्या खासगी निधीसाठी पळाले आहेत. त्यांनी खासदार निधी मतदारसंघात किती खर्च केला, हे तुम्हीच बातम्यांमधून दाखवले आहे. संसदेत त्यांनी परभणीच्या प्रश्नांवर किती वेळा तोंड उघडले आणि मंत्र्यांकडे जाऊन काय सोडवले, याचा सगळा हजेरीपट आमच्याकडे आहे,” असा घणाघात त्यांनी केला. जर आपण वेळीच लक्ष दिले असते, तर यांच्या अनेक भानगडी बाहेर काढल्या असत्या, असा इशाराही त्यांनी दिला. परभणीकरांनी शिवसेनेला नेहमीच भरभरून दिले असून पहिला महापौरही दिला, त्यामुळे हा बालेकिल्ला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संजय राऊत यांच्यासह परभणी दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील ‘ऑपरेशन टायगर’वर खोचक टिप्पणी केली. “पक्षात अंतर्गत गटबाजी सर्वत्रच असते, पण या बंडखोरीला ‘ऑपरेशन टायगर’ नाव देणे हास्यास्पद आहे. हे खरे तर ‘ऑपरेशन देवेंद्र’ असावे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. “देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाऊ द्यायचे नसेल किंवा त्यांना देशाचे पंतप्रधान होऊ द्यायचे नसेल, म्हणूनच भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत कुणाची तरी ही मोठी राजकीय खेळी असू शकते,” असा संशय व्यक्त करत त्यांनी महायुतीमधील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवले. खासदार फुटले तरी परभणीतील निष्ठावान शिवसैनिक नव्या जोमाने संघटना मजबूत करतील, असा निर्धार या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.




