अजित पवारांच्या जाण्याला ५ महिने पूर्ण होताच निष्ठावंतांचा संयम सुटला; वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात पक्षांतराच्या चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला पाच महिने उलटल्यानंतर आता पक्षात अंतर्गत अस्वस्थता उघडपणे समोर येऊ लागली आहे. अजितदादांचे खंदे समर्थक, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी सोशल मीडियावर लिहिलेली एक भावनिक आणि तितकीच आक्रमक पोस्ट सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वादळ निर्माण करत आहे. “दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!” अशा शब्दांत त्यांनी पक्षामधील बदललेल्या वातावरणावर थेट निशाणा साधला आहे. दादांच्या अनुपस्थितीत आता सामान्य कार्यकर्त्यांची पक्षात घुसमट होत असल्याचे या पोस्टवरून स्पष्ट होत असून, सारंग राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का? या चर्चांना वेग आला आहे.
सलीम सारंग यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केवळ श्रद्धांजली वाहिलेली नाही, तर सध्याच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. “आज स्वतःच्याच पक्षात ओळख सांगावी लागते, वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि वारंवार विनंत्या करूनही समोरून साधे उत्तर मिळत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली बोचणी बोलून दाखवली. कार्यकर्त्यांचा आवाज आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ऐकलाच जात नाही, अशी घणाघाती टीका करत त्यांनी राष्ट्रवादीत एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मान्य केले आहे. अल्पसंख्याक समाजात मोठा प्रभाव असलेल्या एका बड्या नेत्याने थेट नाराजी जाहीर केल्यामुळे पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, अजितदादांच्या निधनाला पाच महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करत आपल्या भावनिक आठवणींना उजाळा दिला आहे. एकीकडे कुटुंबाकडून आणि पक्षाकडून दादांच्या आठवणी काढल्या जात असतानाच, दुसरीकडे मात्र तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली पोकळी आणि अस्वस्थता आता स्फोटक वळणावर पोहोचली आहे. सलीम सारंग यांच्या या पावलामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




