नागपूर शहरातील न्यूरॉन रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे रुग्णालयातील कामकाज पूर्ण केल्यानंतर ते आपल्या केबिनमध्ये गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते बाहेर न आल्याने सहकाऱ्यांना संशय आला. अनेकदा हाक मारून आणि दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून केबिनचा दरवाजा उघडला असता डॉ. चांदेवार बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासादरम्यान केबिनमध्ये काही इंजेक्शन्स आढळून आल्याने इंजेक्शनच्या अतिमात्रेमुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे. डॉ. चांदेवार यांच्या अचानक निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात असून नागपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.




