Vaibhav Sooryavanshi : मैदानावर ‘राडा’ करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने ड्रेसिंग रुममध्ये कोणाचे आशिर्वाद घेतले?

spot_img

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय ‘अ’ संघातील १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या त्याच्या खेळापेक्षा मैदानाबाहेरील दोन वेगवेगळ्या व्हिडिओंमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. १५ जून रोजी दांबुला येथे खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारत ‘अ’ संघाला श्रीलंका ‘अ’ संघाकडून सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मैदानावर एक धक्कादायक प्रकार घडला. विजयाच्या उन्मादात असलेल्या श्रीलंकन खेळाडूंनी पॅव्हेलियनमध्ये परतत असलेल्या वैभव सूर्यवंशीला उद्देशून काही चिथावणीखोर वक्तव्ये केली. या स्लेजिंगमुळे संतप्त झालेल्या वैभवने संयम गमावला आणि समोरच्या श्रीलंकन खेळाडूला थेट धक्का दिला, ज्याच्या प्रत्युत्तरात त्या खेळाडूनेही वैभवला धक्का दिला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून क्रीडा वर्तुळात यावर मोठी चर्चा सुरू आहे.

मात्र, या वादावादीच्या काही वेळानंतरच वैभव सूर्यवंशीचे एक पूर्णपणे वेगळे आणि सुसंस्कृत रूप जगासमोर आले. सामना संपून स्टेडियम रिकामे झाल्यानंतर, श्रीलंकन क्रिकेटचे दिग्गज आणि १९७५ च्या पहिल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व करणारे पहिले वनडे कॅप्टन ‘अनुरा टेनेकुन’ हे तब्बल एक तास भारतीय ड्रेसिंग रूमबाहेर वैभवला भेटण्यासाठी थांबले होते. १५ वर्षांच्या या भारतीय ‘जनरेशनल टॅलेंट’ला भेटण्यासाठी ते स्वतः आले होते. वैभव जेव्हा त्यांना भेटायला आला, तेव्हा त्याने अत्यंत नम्रपणे त्यांच्या पाया पडून (चरण स्पर्श करून) आशीर्वाद घेतले.

अनुरा टेनेकुन यांनी वैभवला जवळ घेत मिठी मारली आणि मैदानावर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याला एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले “तू बाहेरच्या लोकांच्या बोलण्याकडे आणि वादाकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर. लोक काय बोलतील याचा अजिबात विचार करू नकोस, फक्त आणि फक्त तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर.”

या आधी सामन्यात काय घडले यावर नजर टाकली, तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० ओव्हरमध्ये २६५ धावा केल्या होत्या. यात वैभव सूर्यवंशीने १४ चेंडूत १ सिक्स आणि ३ फोर मारत २१ धावांची छोटी पण वेगवान खेळी केली. श्रीलंका संघानेही ५० ओव्हरमध्ये २६५ धावा केल्यामुळे सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत १६ धावा कुटल्या आणि भारताला १७ धावांचे आव्हान दिले. मात्र, भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे यांना ६ चेंडूत केवळ ९ धावाच करता आल्यामुळे भारताला हा सामना ८ धावांनी गमवावा लागला. या पराभवाच्या पदरी आलेल्या निराशेनंतरही ज्येष्ठ खेळाडूचा मान राखत वैभवने घेतलेले आशीर्वाद क्रीडाप्रेमींचे मन जिंकून जात आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ