सुपर ओव्हरमधील पराभवानंतर मैदानावरच खेळाडूंमध्ये बाचाबाची; श्रीलंकन खेळाडूने चिथावणी दिल्यानंतर अवघ्या १५ वर्षांच्या वैभवचा पारा चढला.
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना तब्बल ७७६ धावा कुटून ‘ऑरेंज कॅप’ जिंकणारा आणि अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय टी-२० संघात स्थान मिळवून खळबळ उडवणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ संघादरम्यान दांबुला येथे खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच जोरदार वाद झाला. सोशल मीडियावर या घटनेचा ३५ सेकंदांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, ज्यामध्ये वैभव चिडून श्रीलंकन खेळाडूच्या अंगावर धावून जाताना आणि त्याला हाताने जोराचा धक्का देताना स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरुवातीला क्रीडाप्रेमींमधून वैभवच्या या आक्रमक वर्तनावर टीका केली जात होती आणि त्याला संयम राखण्याचा सल्ला दिला जात होता.
मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा ५९ सेकंदांचा सविस्तर व्हिडिओ आणि आतली माहिती समोर आली, तेव्हा या वादात पूर्णपणे चूक फक्त वैभव सूर्यवंशीची नव्हती हे स्पष्ट झाले आहे. झाले असे की, सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू सूर्यांश शेडगे आणि वैभव सूर्यवंशी अतिशय शांतपणे पॅव्हेलियनच्या दिशेने परतत होते. त्याच वेळी विजयाच्या उन्मादात असलेल्या श्रीलंकेच्या विशेन हलमबागे (Vishen Halambage) या खेळाडूने टाळ्या वाजवत वैभवला उद्देशून थेट अत्यंत चिथावणीखोर विधान केले. “मॅच संपली आहे, आता तू गुपचूप तुझ्या घरी जा” (Match over… now go home), असे टोमणे श्रीलंकन खेळाडूने वैभवला मारले.
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या विरोधी संघाच्या खेळाडूकडून झालेली ही थेट मानहानी आणि स्लेजिंग ऐकून १५ वर्षीय वैभवचा संयम सुटला. त्याने मागे फिरून श्रीलंकन खेळाडूला सडेतोड उत्तर दिले आणि वादावादी वाढल्यानंतर त्याला थेट धक्का दिला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून आले होते. अखेर भारताच्या सूर्यांश शेडगे आणि श्रीलंकेच्या निरोशन डिकवेला यांनी मध्यस्थी करत वैभवला बाजूला केले आणि वाद शांत केला.
या घटनेनंतर क्रीडा वर्तुळात दोन्ही संघांच्या अशा वर्तनावर नाराजी व्यक्त केली जात असून, आयसीसीच्या ‘अ’ संघ नियमांनुसार यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सुरुवातीला दोषी वाटणाऱ्या वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रिया ही केवळ श्रीलंकन खेळाडूच्या मर्यादा ओलांडणाऱ्या चिथावणीमुळेच होती, हे आता स्पष्ट झाले आहे.




