Sanjay Raut : ‘ठाकरे गटाचे खासदार फुटणार’ या चर्चा निव्वळ अफवा; संजय राऊत यांचा माध्यमांवर संताप, सर्व खासदार एकत्र असल्याचा दावा

spot_img

“दिल्लीत मंत्र्याला भेटलो तर एवढी आतडी पिळवटून विचारण्याची गरज काय?”; पत्रकारांच्या उलटतपासणीवर राऊतांचा थेट सवाल

उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार आणि ते आपला स्वतंत्र गट स्थापन करणार, अशा चर्चांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड जोर पकडला आहे. दिल्लीत ठाकरे गटाच्या एका खासदाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्याची भेट घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर या चर्चांना उधाण आले. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर आणि माध्यमांवर जोरदार हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेसचे उदाहरण देत ते म्हणाले, “तृणमूलचे २०-२२ खासदार गेले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय पक्षात प्रवेश केला. याला तुम्ही भाजपची हाव म्हणू शकता. मात्र, शिवसेनेच्या (ठाकरे गट) बाबतीत तुम्ही ज्या काही बातम्या चालवत आहात, त्या पूर्णपणे चुकीच्या आणि खोट्या आहेत.”

पक्षातील काही खासदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत चांगलेच भडकले. “अशी नाराजी त्यांनी कधी आणि कोणाकडे बोलून दाखवली?” असा उलटा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याइतका लोकप्रतिनिधींना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सातत्याने भेटणारा दुसरा कोणताही नेता नाही, असे सांगत ‘मातोश्री’चे दरवाजे सर्वांसाठी सदैव उघडे असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील खासदार मुंबईत आले की हमखास उद्धव ठाकरेंची भेट घेतात आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात आमदारही त्यांना भेटत असतात. त्यामुळे तुमच्यापर्यंत आलेली माहिती चुकीची असून, या क्षणी शिवसेनेचे सर्व ९ खासदार पूर्णपणे एकत्र आणि एकनिष्ठ आहेत, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच, ईडी आणि सीबीआय ही स्वायत्त यंत्रणा केवळ मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाचे साधन बनली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, पक्षाच्या अधिकृत बैठकीला दांडी मारून खासदार दिल्लीत सत्ताधारी मंत्र्यांच्या भेटीला मागच्या दाराने का जातात, अशा शब्दांत पत्रकारांनी कोंडी करण्याचा प्रयत्न करताच संजय राऊत यांचा पारा चढला. “तुम्ही माझी उलटतपासणी घेताय का? पत्रकारांसारखे सरळ प्रश्न विचारा. एखादा खासदार आपल्या मतदारसंघाच्या किंवा राष्ट्रीय हिताच्या कामासाठी देशाच्या पंतप्रधानांना किंवा केंद्रीय मंत्र्यांना भेटूच शकतो. पंतप्रधान आणि मंत्री हे संपूर्ण देशाचे असतात, कुठल्या एका पक्षाचे नसतात. त्यामुळे या एका भेटीवरून एवढी आतडी पिळवटून घेण्याची आणि गैरसमज पसरवण्याची अजिबात गरज नाही,” अशा कडक शब्दांत राऊत यांनी आपल्या खासदारांचा बचाव करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ