वॉशिंग्टनकडून प्राथमिक योजनेची आखणी; क्युबा, कोलंबिया आणि पेरूमध्ये लष्करी हालचाली वाढण्याची चिन्हं
आंतरराष्ट्रीय राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता शांतता कराराने संपण्याच्या मार्गावर असतानाच, अमेरिका आता आणखी तीन देशांविरोधात नव्या युद्धाची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (Department of War) याबाबतची एक प्राथमिक रूपरेषा तयार केली असून, यावेळी त्यांच्या निशाण्यावर क्युबा, कोलंबिया आणि पेरू हे दक्षिण अमेरिकन देश आहेत. आपल्या इतिहासात आतापर्यंत सुमारे ४०० लहान-मोठ्या युद्धांमध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग नोंदवणाऱ्या अमेरिकेमुळे या भागात पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत.
या संपूर्ण योजनेत कम्युनिस्ट विचारसरणीचे सरकार असलेला क्युबा हा देश अमेरिकेच्या रडारवर सर्वात वर आहे. अमेरिकेने क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांवर बक्षीस जाहीर केले असून, क्युबाच्या सागरी सीमांजवळ मोठ्या प्रमाणावर नौदलाची तैनात केली आहे. नुकतेच अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी एका निवेदनात स्पष्ट केले की, ‘क्युबाबाबत उद्भवणाऱ्या कोणत्याही संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे.’ याआधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी देखील क्युबाचा उल्लेख एक ‘अयशस्वी राष्ट्र’ (Failed State) असा केला होता, ज्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.
क्युबाव्यतिरिक्त कोलंबिया आणि पेरू या देशांशीही अमेरिकेचे संबंध विकोपाला गेले आहेत. जानेवारी २०२६ मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाविरुद्ध लष्करी कारवाईचे संकेत दिले होते, जे आता पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पेरूमध्ये सातत्याने वाढत असलेल्या डाव्या आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावामुळे ट्रम्प प्रशासनाची चिंता वाढली आहे. पेरूतील निवडणुकांदरम्यान ट्रम्प यांनी तिथे कम्युनिस्ट सरकार सत्तेत येऊ नये, असा थेट इशारा दिला होता. चीन, रशिया आणि उत्तर कोरिया या पारंपरिक शत्रूंसोबतच आता व्हेनेझुएला, मेक्सिको आणि ब्राझीलसारख्या देशांशीही अमेरिकेचे संबंध ताणले गेले असल्याने, आगामी काळात जागतिक राजकारणात मोठे लष्करी फेरबदल पाहायला मिळू शकतात.




