संसदेतील वादग्रस्त वक्तव्यानंतर तरुण पिढी आक्रमक; काठमांडूमध्ये मशाल मोर्चा काढत राजीनाम्याची मागणी
नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी तरुण पिढीने (जेन झी – Gen Z) केलेल्या मोठ्या आंदोलनानंतर ऐतिहासिक सत्तापालट झाला होता. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अभूतपूर्व बहुमत मिळवून ‘राश्ट्रीय स्वतंत्र पार्टी’चे प्रमुख बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान झाले. मात्र, ज्या तरुण पिढीच्या (जेन झी) बळावर बालेन शाह सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर बसले, आता तीच तरुण पिढी त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. बालेन शाह यांनी संसदेत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे नेपाळमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, राजधानी काठमांडूमध्ये तरुणांनी त्यांच्याविरोधात थेट ‘मशाल मोर्चा’ काढला आहे. बालेन शाह यांचे विधान राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप करत तरुणांनी आता त्यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यापासून एकामागून एक भारतविरोधी निर्णय घेण्याचा धडाका लावला होता. त्यांनी सुरुवातीला भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लादला, त्यानंतर भारतीय वाहनांच्या पॉलिसीमध्ये बदल करत प्रचंड टोल लागू केला. एवढेच नव्हे तर, भारताच्या मालकीच्या लिपुलेख परिसरावर दावा करत या सीमावादात ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या संसदेतील त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी नेपाळचे परराष्ट्र धोरण स्पष्ट करताना एक असे विधान केले, जे त्यांच्याच देशातील नागरिकांना रुचलेले नाही.
लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या सीमाभागांबद्दल बोलताना पंतप्रधान बालेन शाह म्हणाले की, “भारताने नेपाळच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे, हे मला ठाऊक आहे; परंतु पंतप्रधान झाल्यावर मला हे देखील समजले की, ज्याप्रमाणे भारताने नेपाळच्या काही जमिनीवर ताबा मिळवला आहे, अगदी त्याचप्रमाणे नेपाळने देखील भारताच्या अनेक जमिनींवर ताबा मिळवला आहे.” पंतप्रधानांच्या या दाव्यामुळे नेपाळच्या राजकीय वर्तुळात आणि तरुणांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. नेपाळने भारताची जमीन हडपल्याचे विधान करून पंतप्रधानांनी देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत ‘जेन झी’ आंदोलक कमालीचे आक्रमक झाले आहेत. या नव्या आंदोलनामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या बालेन शाह यांचे पंतप्रधानपद आता धोक्यात आले असून नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय अस्थिरतेची चिन्हे निर्माण झाली आहेत.




