‘NPPA’ चा २७ मे २०२६ पासून नवा नियम लागू; निर्धारित किमतीपेक्षा जास्त पैसे उकळल्यास थेट कायदेशीर कारवाई होणार, रुग्णांना मोठा दिलासा
भारतातील औषध क्षेत्रातील ब्रँड्सच्या नावाखाली चालणाऱ्या दरवाढीला आणि ग्राहकांच्या लुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट अशा गंभीर आजारांवर रोज लागणाऱ्या ३० अत्यंत महत्त्वाच्या औषधांची कमाल किरकोळ किंमत (MRP) निश्चित केली आहे. २७ मे २०२६ पासून हा नवा नियम संपूर्ण देशात लागू झाला असून, आता कोणतीही औषध कंपनी किंवा मेडिकल स्टोअर या ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा एक रुपयाही जास्त आकारू शकणार नाही. असे केल्यास तो कायद्याने गुन्हा मानला जाईल.
भारतात अनेकदा एकाच घटकाचे औषध वेगवेगळ्या ब्रँड्सच्या नावाखाली १५ रुपयांपासून ते अगदी ४० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या किमतीत विकले जाते. रुग्णांना या योग्य किमतीची माहिती नसल्याने आणि डॉक्टरांनी लिहून दिलेला विशिष्ट ब्रँडच खरेदी करावा लागत असल्याने महिन्याचा औषधांचा खर्च हजारो रुपयांवर जातो. याच मनमानीला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दर निश्चिती केली आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार नाही.
निश्चित केलेले नवीन औषध दर (प्रति गोळी/नग)
- मधुमेह (Diabetes): विल्डाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन कॉम्बो गोळी आता जास्तीत जास्त ₹९.७९ ला मिळेल. तर सिटाग्लिप्टिन, ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन कॉम्बोची किंमत ₹१०.३९ ते ₹११.९१ आणि टेनेलिग्लिप्टिन-डॅपाग्लिफ्लोझिनची किंमत ₹१०.१७ निश्चित केली आहे. यामुळे महिन्याचा खर्च ₹३०० ते ₹३६० च्या वर जाणार नाही.
- हृदयविकार व रक्तदाब (Heart & BP): बिसोप्रोलोल आणि अॅम्लोडिपिन कॉम्बो ₹७.३१ ते ₹९.४० आणि सिल्निडिपिन-टेल्मिसार्टन गोळ्या ₹१२.९८ ते ₹१४.९५ ला मिळतील.
- कोलेस्ट्रॉल (Cholesterol): ॲटोरवास्टॅटिन आणि फेनोफायब्रेटची किंमत ₹१८.४६ असेल.
- अवयव प्रत्यारोपण (Transplant): किडनी किंवा यकृत प्रत्यारोपणानंतर लागणारे अत्यंत महागडे ‘टॅक्रोलिमस प्रोलॉन्गड रिलीज’ कॅप्सूल आता ₹१२७ प्रति कॅप्सूल या दराने उपलब्ध होईल, ज्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
- इतर औषधे: हाडांसाठीचे व्हिटॅमिन डी ३ ओरल सोल्यूशन ₹१४.९१ ते ₹१५.८८ (प्रति मिली), ऍलर्जी-दम्यासाठीची बिलास्टीन-मॉन्टेलुकास्ट गोळी ₹२१.२२ आणि ताप-दुखण्यावरील पॅरासिटामॉल कॉम्बो गोळी फक्त ₹५.१५ ला मिळेल.
नागरिकांनी औषध खरेदी करताना पाकिटावर छापलेली नवीन ‘एमआरपी’ अवश्य तपासावी. जर एखादा दुकानदार छापील दरापेक्षा जास्त पैशांची मागणी करत असेल, तर ग्राहक म्हणून तुम्ही त्याला थेट नकार देऊ शकता. या संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहक राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाला (nppa.gov.in) भेट देऊ शकतात किंवा आपल्या जिल्ह्यातील ‘राज्य औषध नियंत्रक कार्यालयाशी’ संपर्क साधून कायदेशीर तक्रार दाखल करू शकतात.




