पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत दोषींना कोणतीही सूट देऊ नका, असा स्पष्ट इशारा दिला आहे. “या प्रकरणात कोणतीही ढिलाई चालणार नाही. सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा,” असे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरू असून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे कारवाई करत आहेत. शहरातील विविध भागांत रात्रीभर छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह आणखी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सर्व आरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. विषारी दारूची निर्मिती कुठे झाली आणि ती शहरात कशी पोहोचली, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पुढील काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
या भीषण घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.




