सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांची चर्चा झाली की ‘दृश्यम’ या नावाचा उल्लेख हमखास होतो. मोहनलाल यांच्या दमदार अभिनयामुळे आणि थरारक कथानकामुळे या फ्रेंचायझीने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पुन्हा एकदा चित्रपटाने आपल्या दर्जेदार कथानकाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. हिंदी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाची मोठी उत्सुकता असून, सध्या हा सिनेमा मल्याळमसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये इंग्लिश सबटायटल्ससह पाहता येत आहे.
‘दृश्यम 3’मध्ये जॉर्जकुट्टीची कथा नव्या वळणावर पोहोचते. आपल्या कुटुंबाला एका गंभीर गुन्ह्यापासून वाचवणारा जॉर्जकुट्टी आता ‘दृश्यम’ नावाचा चित्रपट निर्माता बनलेला असतो. त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील घटनांवर आधारित हा चित्रपट मोठा हिट ठरतो. मात्र, भूतकाळ पुन्हा त्याचा पाठलाग करू लागतो आणि त्याच्या कुटुंबावर पुन्हा संकट ओढवते. यावेळी जॉर्जकुट्टी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कशा प्रकारे वाचवतो, हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरते.
चित्रपटाची सुरुवात शांत आणि साध्या वातावरणातून होते. मात्र कथा जसजशी पुढे सरकते, तसतसा थरार वाढत जातो. इंटरव्हलनंतर येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून सोडतात. विशेषतः क्लायमॅक्स इतका अनपेक्षित आहे की पुढे काय होणार याचा अंदाज बांधणं कठीण होतं.
मोहनलाल यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता आणि मनातील गूढता चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. मीना, अंसिबा हसन, एस्थर अनिल आणि इतर कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक जिथू जोसेफ यांनी लेखन आणि दिग्दर्शनातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, उत्तम सस्पेन्स निर्माण करण्यासाठी मोठा गोंधळ नव्हे तर दमदार कथा महत्त्वाची असते.




