ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
वाहन चालकांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांच्या सुचनेनुसार पुणे ग्रामीण घटकातील अपघाताचे प्रमाण १५ टक्के ते २० टक्के कमी करणेचे द्रष्टीने रोड सेफ्टी व चालकामध्ये जनजागृती अभियान सुरू केले आहे.
ओतूर पोलीसांच्या वतीने,वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी सांगीतले.
सदरचे अभियान पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अहिल्यानगर – कल्याण या महामार्गावर ओतूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अपघात होत असून,या पार्श्वभूमीवर ओतूर पोलीस ठाण्याकडून पिकअप चालक-मालक व इतर वाहान चालकांना भेटून वाहतूक नियमा बाबत जनजागृती केली.
यावेळी वाहन चालवताना वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये,हेल्मेट वापरावे,सोबत लायसन बाळगावे.धोकादायक रित्या वाहन चालू नये,धोकादायक रित्या मालाचे वाहतूक ही करू नये,सीट बेल्टचा वापर करावा,ट्रिपल सीट करू नये,वाहनाचे इंडिकेटर वगैरे सुस्थितीत ठेवणे,वाहनाचे क्रमांक फलक आरटीओ नियमानुसार असावे. वाहनाचे इन्शुरन्स व पिऊसी काढणे. रहदारीस अडथळा होईल अशी वाहने लावू नये. ब्लॅक फिल्मिंग करू नये.कर्कश हॉर्न वापरू नये,मध्य प्राशन करून वाहन चालवू नये.वेगमर्यादा पाळावी वाहनांचा वेग नियंत्रित होईल इतकंच स्पीड असावं.वाहनांचे टायर सुस्थितीत असावे. इतर वाहनांस ओव्हर टेक काळजीपूर्वक करावा. रोडवरील दिशादर्शक फलक समजुन घ्यावे.अल्पवयीन मुलांस पालकांनी वाहने देऊ नये.वाहनांचे ब्रेक क्लच सुस्थितीत असावे असे सांगून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास, पोलीस कठोर अशी कायदेशीर दंडात्मक कारवाई करतील असे बाजगिरे यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या समवेत ट्रॅफिकचे पोलीस कर्मचारी किशोर बर्डे,नामदेव बाबळे आदी कर्मचारी यावेळी उपस्थीत होते.




