हैदराबादच्या आउटर रिंग रोडवर भरधाव कार कंटेनरला धडकली; ‘टेनंट’ फेम अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, एक उगवता तारा कायमचा मावळला आहे. तेलगू सिनेमांतील प्रतिभावान तरुण अभिनेता भरत कांत आणि सिनेमॅटोग्राफर त्रिलोक यांचा रविवारी रात्री एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. नेल्लोरहून हैदराबादच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये या दोन्ही कलाकारांनी जागीच प्राण गमावले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात हैदराबादमधील आदिबटला पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आउटर रिंग रोडवरील एक्झिट क्रमांक १२ जवळ घडला. भरत कांत यांची कार आणि समोरून येणारी एक भरधाव कंटेनर लॉरी यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की गाडीचा चक्काचूर झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे.
भरत कांत हा साऊथ इंडस्ट्रीतील एक आश्वासक चेहरा म्हणून ओळखला जात होता. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टेनंट’ या चित्रपटातील ‘ऋषी’ या भूमिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. जरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली, तरी भरतच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते. याशिवाय तो ‘ग्राम’ सारख्या वेब सीरिज आणि काही हिंदी प्रकल्पांमध्येही झळकला होता.
सिनेमॅटोग्राफर त्रिलोक यांच्या निधनानेही तंत्रज्ञ वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दोन्ही कलाकारांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सोशल मीडियावरून त्यांच्यावर श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे. ऐन उमेदीच्या काळात काळाने या दोन हिऱ्यांना हिरावून नेल्याने सिनेसृष्टी हळहळत आहे.




